अबाऊट टर्न : महाप्रताप

-हिमांशू

गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही, अशी ओरड बऱ्याच वर्षांपासून आपण ऐकत आहोत. गुन्हे घडू नयेत म्हणून कितीतरी उपाययोजना केल्या गेल्या, कायदे कठोर केले गेले. सीसीटीव्ही बसवले गेले; मात्र गुन्हेगार या सगळ्यापेक्षा दोन पावलं पुढेच!

कायद्यातून पळवाटा ते गुन्हा करण्यापूर्वीच शोधून ठेवतात आणि सीसीटीव्हीसमोर चेहरा झाकून जातात. हे कमी म्हणून की काय, चोरीची मोहीम फत्ते झाल्याच्या आनंदात म्हणा किंवा टेन्शन कमी करण्यासाठी म्हणा, एक चोरटा चोरीच्या ठिकाणी चक्‍क सीसीटीव्हीसमोर नाचताना दिसून आला होता. खरं तर सीसीटीव्हीच्या तंत्रज्ञानाची चोरट्यानं उडवलेली ती खिल्ली होती, असंच तो व्हिडीओ पाहून वाटलं.

गुन्हेगार कायद्याला घाबरत नसतील; पण कायदे करणाऱ्यांना तरी ते निश्‍चित घाबरत असतील, असं वाटत होतं. परवा तोही गैरसमज दूर झाला. चोरटे चोरी करण्यासाठी ठिकाण किंवा माणसं हेरतात तेव्हा ते संबंधिताच्या जातीचा, धर्माचा विचार करत नाहीत, त्याचप्रमाणे ते पक्षनिरपेक्ष असतात, हेही स्पष्ट झाले. राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती किती बिकट आहे, हे विधिमंडळात बसणाऱ्यांना कधी समजणारच नाही आणि म्हणूनच ती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना सरकारकडून केल्या जाणार नाहीत, यावर नागरिकांनी आता जवळजवळ शिक्‍कामोर्तबच केलंय. म्हणूनच, विधिमंडळात बसणाऱ्यांनाही चोरटे सोडत नाहीत, हा अनुभव नागरिकांसाठी धक्‍कादायक आणि काही प्रमाणात आशादायकही ठरू शकतो.

कल्याण रेल्वेस्थानकावर दोन-तीन आमदारांनाच चोरट्यांनी हिसका दाखवला. आमदारांना या घटनेचा धक्‍का बसला असणारच; पण रेल्वेत बसताना, उतरताना आणि प्रवास करताना आपल्याकडील चीजवस्तू जागेवर आहेत की नाही, हे वारंवार तपासून पाहणाऱ्या सामान्यजनांसाठी हा त्याहून मोठा धक्‍का होता. रेल्वे प्रवास असुरक्षित आहेच; पण आमदारांसाठी रेल्वेला जोडलेली खास बोगी तरी सुरक्षित असेल, अशी किमान आमदारांना तरी खात्री वाटायला हवी.

आमदारांचा हा भ्रम चोरट्यांनी दूर केला. बुलडाण्याचे कॉंग्रेस पक्षाचे आमदार राहुल बोंद्रे विदर्भ एक्‍स्प्रेसने सपत्निक प्रवास करत होते. कल्याण स्टेशनवर उतरण्याच्या तयारीत असतानाच आमदारांच्या सौभाग्यवतींची पर्स हिसकावून चोरटे पळून गेले. पैशांच्या आमिषानं पर्स चोरीला जाणं एकवेळ स्वाभाविक मानता येईल; पण आमदारसाहेबांची महत्त्वाची कागदपत्रे असलेली फाईल चोरट्यांनी का पळवली, हे मात्र समजत नाही.

शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर आणि शशिकांत खेडेकर यांनाही चोरट्यांनी आपला प्रताप दाखवला. देवगिरी एक्‍स्प्रेसमधून हे दोघे प्रवास करत होते. कल्याण स्टेशनवर उतरताना आपल्या खिशातले दहा हजार रुपये गायब झाल्याचे रायमुलकर यांच्या लक्षात आले. फोन करून कुणाला बोलवावे, तर मोबाइलसुद्धा चोरीला गेलेला! आमदार खेडेकरांनासुद्धा आपली बॅग चोरट्यांनी ब्लेडने फाडल्याचे लक्षात आले.

चोरटे आपल्याही चीजवस्तूंवर हात साफ करू शकतात, हे आमदारांच्या मनात येणं किंवा त्यांनी तसं गृहीत धरणं शक्‍यच नाही. आपण रेल्वे प्रवासाला निघालो तर आपल्याला असंख्य लोक “टिप्स’ देत असतात. आमदारांना कोण सूचना देणार? उलट ही मंडळी पावसाळी अधिवेशनासाठी निघालीत म्हटल्यावर “आमदारसाहेब, आमचं तेवढं काम करा की!’ असं म्हणणाऱ्यांचीच गर्दी त्यांच्याभोवती प्रवासाला निघताना असणार. आशा एवढीच की, कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा किमान या तिघांनी तरी विधानसभेत मांडावा!

Leave A Reply

Your email address will not be published.