नवी दिल्ली – महादेव बेटिंग ऍपच्या प्रवर्तकांनी छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना 508 कोटी रूपये दिल्याची माहिती चौकशीतून पुढे आली, असा दावा शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस नेते बघेल ईडीच्या रडारवर येण्याची चिन्हे आहेत.
छत्तिसगढमध्ये ईडीने असीम दास नावाच्या कॅश कुरियरला अटक केली. त्याच्याकडून 5.39 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याने चौकशीवेळी महत्वाची माहिती दिल्याचा दावा ईडीने केला. जप्त करण्यात आलेल्या रकमेची व्यवस्था महादेव ऍपच्या प्रवर्तकांनी केली. छत्तिसगढमधील निवडणूक खर्चासाठी ती रक्कम बघेल नावाच्या राजकीय व्यक्तीला द्यायची होती, अशी कबुली दासने दिली. त्याच्या फोनची न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली.
ED has conducted search operations on 2/11/2023 against the money laundering networks linked with Mahadev Book Online Betting APP in Chhatishgarh in which Cash of Rs. 5.39 Crore and Bank balance Rs. 15.59 Crore has been intercepted and frozen/ seized. pic.twitter.com/ZItQV2VWOB
— ED (@dir_ed) November 3, 2023
त्याशिवाय, एका ई-मेलची छाननी करण्यात आली. त्यातून भुपेश बघेल यांना आतापर्यंत नियमितपणे रक्कम पाठवण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. त्या प्रकरणी तपासाची गरज आहे, असे ईडीकडून नमूद करण्यात आले. छत्तिसगढमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान तोंडावर येऊन ठेपले असतानाच ईडीने राजकीयदृष्ट्या खळबळजनक दावा केला.