जीएसटी दरात तातडीने 10 टक्‍के कपातीचा आग्रह

वाहन उत्पादक कंपन्यांची एकजूट

नवी दिल्ली – वाहन निर्मात्या कंपन्यात कसलेही मतभेद नाहीत. त्याचबरोबर या सर्व कंपन्यांनी वाहनांवरील जीएसटी 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्‍के करण्याची एकमुखी मागणी केली आहे, तसे निवेदन वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सिआमने जारी केले आहे.

काही दिवसांपूर्वी वृत्त माध्यमात वाहन उत्पादकांमध्ये या मुद्द्यावरून मतभेद असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सिआमचे अध्यक्ष राजन वढेरा यांनी सांगितले की कार, दुचाकी आणि तीनचाकी वाहन निर्मात्यांनी जीएसटी कमी करण्याचा आग्रह सरकारकडे केला आहे.

मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी जीएसटी कपात केल्यास सरकारचा महसूल कमी होईल, असे म्हटल्याचे वृत काही माध्यमांनी दिले होते.

वढेरा म्हणाले की, सध्या वाहन विक्री कमी झाली आहे. त्याचबरोबर सर्वच कंपन्यांना बीएस – 6 उत्सर्जन नियमाच्या अंमलबजावणीसाठी बरीच गुंतवणूक करावी लागत आहे. त्यातच वाढीव जीएसटीमुळे काही तिमाहीपासून ग्राहक खरेदी करीत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात मंदी निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी सरकारने जीएसटी कमी करावा असे सर्व सदस्यांना वाटते. अन्यथा या क्षेत्राची उत्पादकता कमी होऊन बेरोजगारी वाढू शकते. गेल्या काही महिन्यांत बऱ्याच वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी मागणी नसल्यामुळे उत्पादनात कपात केलेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.