Earthquake in Nepal : नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत. मकवानपूर जिल्ह्यातील चितलांगमध्ये गुरुवारी (23 नोव्हेंबर) पहाटे 4.5 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. मात्र या भूंकपामुळे मोठे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. या महिन्याच्या सुरुवातीला 3 नोव्हेंबर रोजी नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.
यातून नेपाळ सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आज पहाटे पुन्हा एकदा येथे भुंकपाचे धक्के जाणवले. 3 नोव्हेंबरला नेपाळमध्ये जाणवलेल्या 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपात जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी झाली. त्यादरम्यान 157 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो लोक जखमीही झाले होते.
जाजरकोट येथे जाणवलेल्या भूकंपात सुमारे 8000 घरे उद्ध्वस्त झाली होती. त्या काळात भारताने भूकंपग्रस्त लोकांना आपत्कालीन मदत सामग्री पाठवली होती, ज्यामध्ये वैद्यकीय उपकरणे, मदत सामग्री आणि बरेच काही समाविष्ट होते. भारताने आतापर्यंत नेपाळमधील बाधित कुटुंबांसाठी 34 टन पेक्षा जास्त आपत्कालीन मदत सामग्री पाठवली आहे.
2015 मध्ये नेपाळमध्ये झाला होता भुंकप
नेपाळच्या इतिहासातील सर्वात भीषण भूकंप 2015 साली जाणवला होता. त्यादरम्यान, भूकंपाची तीव्रता 7.8 आणि 8.1 इतकी मोजली गेली तेव्हा 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 25 एप्रिल 2015 रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:56 वाजता भूकंपाचे हे धक्के जाणवले होते. त्यावेळी अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि वास्तू यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.