तेहरान (इराण): इराणमधील बुशेहर येथील एकमेव अणुभट्टीपासून जवळच आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 5.1 इतकी होती. बोराझान शहरापासून दक्षिण पूर्वेकडे 44 किलोमीटरवर आणि जमिनीखाली 38 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्र बिंदू होता. दक्षिण पश्चिम आखाती किनाऱ्याजवळील बुशेहर अणुउर्जा प्रकल्पापासून हा केंदबिंदू 45 किलोमीटर पूर्वेकडे होता. या भूकंपामुळे या अणुउर्जा प्रकल्पाचे किती नुकसान झाले, याची माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकली नाही. या भूकंपाची तीव्रता 4.9 असून त्याची खोली 10 किलोमीटर इतकी होती, असे इराणच्या सिस्मोलॉजिकल सेंटरने आपल्या संकेतस्थळावरील प्राथमिक अहवालात म्हटले आहे. या भूकंपामुळे कळमेह शहराजवळील खेड्यांना धक्का बसला, पण अद्याप कोणत्याही नुकसानाची कोणतीही नोंद नाही, असे निमसरकारी वृत्तसंस्था “आयएसएनए’ने सांगितले आहे.
बुशहर अणु उर्जा प्रकल्पामध्ये एक हजार मेगावॅट वीज उत्पादन होते, रशियाने हा प्रकल्प बांधला आहे. त्यासाठी अनेक वर्षांचा विलंब केला गेला होता आणि सप्टेंबर 2013 मध्ये अधिकृतपणे हस्तांतरित केला होता. इराण येत्या काही वर्षांत तेल आणि गॅसवरील आपले अवलंबून राहणे कमी करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी नियोजित 20 अणु सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.