बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला. या प्रकरणावर सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.
आता या घराणेशाहीच्या वादात अभिनेत्री प्राची देसाईने देखील उडी मारली आहे. प्राची सध्या बेरोजगार आहे. तिच्याकडे सध्या कुठलाच चित्रपट नाही. अन् यासाठी तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरले आहे.
प्राचीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या आपल्या करिअरवर भाष्य करत असतानाच घराणेशाहीवर देखील निशाणा साधला. प्राची म्हणाले, घराणेशाही हे बॉलीवूडमधील एक कटू सत्य आहे. अन् तुम्ही ते कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी दररोज तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो. खरा स्टार कोण हे प्रेक्षकच ठरवतात असे म्हटले जाते. परंतु हे अर्धसत्य आहे.
प्रेक्षकांसमोर कोण झळकणार हे मात्र बॉलीवूडमधील काही ठराविक गट ठरवतात. मला टीव्ही मालिकांमधून जे यश मिळाले तसं यश चित्रपटांमध्ये मिळाले नाही. यासाठी माझा अभिनय नव्हे तर घराणेशाही कारणीभूत आहे.
अनेक चांगल्या भूमिका मला स्टारकिड्ससाठी सोडाव्या लागल्या. शिवाय ज्या चित्रपटांमध्ये काम मिळत होते तिथं तडजोड करण्यास सांगितले जात होते. अन् अशा प्रकाराला नकार दिल्यामुळे सध्या मला चित्रपट मिळत नाही, असा अनुभव प्राचीने या मुलाखतीत सांगितला.