लोणावळा – टपालाच्या ‘पार्सल’ च्या माध्यमातून लोणावळा टपाल कार्यालयात आलेले आंतरराष्ट्रीय ड्रग्ज असलेले मरीजुना,गांजा,बड पार्सल एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) मुंबईच्या टीमने कारवाई करीत ताब्यात घेतला. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी श्रीमय परेश शहा (वय 26, रा. अहमदाबाद, गुजरात), ओमकार जयप्रकाश तुपे (वय 28, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.
टपाल पार्सलच्या माध्यमातून लोणावळा टपाल कार्यालयात मरीजुना/गांजा/बड हे आंतरराष्ट्रीय ड्रग्जचे पार्सल येणार असल्याचे माहिती एनसीबी टीमला मिळाल्यानंतर या टीमने लोणावळा टपाल कार्यालयात पाहणी करत पार्सलमध्ये आलेला 1036 ग्रॅम वजनाचा मरीजुना/गांजा/बड ताब्यात घेण्यात आला, तर तपासात अजून 74 ग्रॅमचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
कॅनडामार्गे हे मरीजुना,गांजा, बड मुंबई, गुजरात, अहमदाबाद भागात येत असल्याची माहिती “एनसीबी’ने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यांची किंमत 50 ते 55 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मरीजुना,गांजा,बड लोणावळ्यात कसे व कोणाच्या पत्त्यावर आला, यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का याचा तपास सध्या सुरू आहे.