पाथर्डी : तालुक्यातील माळीबाभूळगाव ग्रामपंचायत हद्दीत देशी- विदेशी बनावटी मद्य कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने धाड टाकली. हा गोरखधंदा गावातील शिक्षक कॉलनीत सुरु होता.
यावेळी पोलिसांनी सुमरे ५ लाखाचा मुद्देमाल जप्त करून, आरोपी विजय आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षण दिलीप पवार यांना माळीबाभुळगावात मद्य कारखाना सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मद्य कारख्यानावर धाड टाकून कारवाई केली.
पोलिसांना घटनास्थळी बनावट देशी दारूच्या बाटल्या, बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या,बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारे मशीन,विविध दारू कंपन्यांचे नाव असलेले सीलबंद करण्याचे मशीन, झाकण, रिकाम्या बाटल्या, हजारो पॉलिकॅप, देशी-विदेशी दारूचे रिकामे बॉक्स असं साहित्य आढळून आले. यावेळी कारखान्याचे मालक विजय आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली असुन, त्यांच्यावर विविध कालमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी विजय आव्हाड यांच्यावर अनेक ठिकाणी बनावट दारू व गुटखा तयार करून विक्री करणे,चंदनचोरी यासह रोजगार हमी योजनेतील लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत.