पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या हद्दीतील सर्व जलतरण तलावांचे सुरक्षा ऑडिट करण्याची सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला केली. यावर क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सर्व जलतरण तलावांचे सुरक्षा ऑडिट करण्यात येईल, असे सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस गळती झाल्याची घटना घडली. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पोहण्यासाठी आलेले नागरिक, जीवरक्षक, सुरक्षा रक्षक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. आमदार लांडगे यांनी रूग्णालयात जावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या दुर्घटनेत खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च महापालिका प्रशासनाने करावा. महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व जलतरण तलावांचे सुरक्षा ऑडिट करावे. भविष्यात अशी घटना समोर येवू नये. यासाठी प्रशासनाने संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी. तसेच, दोषींवर कारवाई करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली.
कासारवाडी जलतरण तलावावर गॅस गळतीची घटना घडली. महापालिका प्रशासनाने गांभीर्याने या घटनेची चौकशी करावी. तसेच, सर्वच जलतरण तलावावरील संबंधित ठेकेदार, एजन्सी यांना सुरक्षा ऑडिट बंधनकारक करावे. नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू नये.
– महेश लांडगे, आमदार