पिंपरी, (प्रतिनिधी) – नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियानअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान आयोजित केले होते. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १२ हजार ४७१ शस्त्रक्रिया केल्याने जिल्हा रुग्णालयाला राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.
शासनाच्या वतीने रुग्णालयाला सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, डॉ. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी, निवासी डॉक्टर वंदना जोशी उपस्थित होते.
या बाबत डॉ. अंजली कुलकर्णी म्हणाल्या, १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. पुणे जिल्ह्यातून आठ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आमच्यावर सोपवले होते. मात्र, पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका आणि इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने १२ हजार ४७१ शस्त्रक्रिया करून १५६ टक्के काम करून कर्तव्य बजावले आहे.
या शिबिरासाठी डॉ. प्रियदर्शिनी पाटील, डॉ. प्रिया हरदास, डॉ. प्रज्ञा निकम, परिचारिका जयश्री दीक्षित, सिस्टर नागपुरे, सिस्टर कल्याणी, सिस्टर योगिता, सिस्टर पूजा, समुपदेशन सीमा हगवणे, संतोष चव्हाण, नेत्र चिकित्सक अधिकारी शामराव राठोड, आदींनी विशेष परिश्रम घेतले. राज्य आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, पूना ऑप्थल्मॉलमिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राधिका परांजपे, सचिव डॉ. सागर वर्धमाने, डॉ. अंजली धाणे यांचे मार्गदर्शन लाभले.