बीजिंग : करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे केंद्रबिंदू राहिलेले चीनमधील वुहान शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या अखेरच्या करोनाग्रस्त रुग्णालाही आज घरी पाठवण्यात आले. त्यामुळे आता वुहान शहरात करोनाची लागण झालेल्या एकाही रुग्णावर उपचार सुरू नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून वुहानमध्ये करोना विषाणूचे थैमान सुरू होते. आतापर्यंत चीनमध्ये 80 हजारांपेक्षा अधिक रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. मात्र आता वुहान शहरात एकही रुग्ण नसल्याची स्थिती प्रथमच निर्माण झाली आहे.
चीनमध्ये रविवारी तीन नवीन रुग्ण सापडले असून त्यापैकी दोघेजण विदेशातून परतलेले तर एकाला स्थानिक पातळीवरच संसर्ग झाला असल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. चीनमध्ये 4,633 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला तर 77,474 जणांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे. रविवारी पूर्ण बरे झालेल्य आणखी 80 जणांना रुग्णालयातून घरी सोडून देण्यात आले.
वुहान शहरात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर करोनाची साथच तिथे पसरली होती. वुहानमध्ये एकेकाळी 38 हजार रुग्णांवर उपचार सुरू होते. देशभरातून सुमारे 42,000 वैद्यकीय कर्मचारी हुबेई येथे पाठविण्यात आले होते. तेथील रुग्णांची संख्या 18 फेब्रुवारीपासून झपाट्याने कमी होत गेली. सर्व देशभरातून वुहानमध्ये पाठवण्यात आलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर वुहानमध्ये सर्व रुग्ण पुर्ण बरे झाले आहेत, असे “एनएचसी’चे प्रवक्ते मी फेंग यांनी सांगितले.