मुंबई – राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, आता त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
यापूर्वी एमपीएससीच्या अध्यक्षपदावर असलेले किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत एमपीएससीला सेठ यांच्या रुपात नवे अध्यक्ष मिळाले आहेत.
एमपीएससीचे अध्यक्ष दत्तात्रय राजे-निंबाळकर हे गेल्या बुधवारी म्हणजेच 22 सप्टेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून तीन नावांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविली.
या तीन नावांमध्ये रजनीश सेठ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश असल्याची माहिती होती. यात रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रजनीश सेठ यांची पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
दरम्यान, याआधी एमपीएससी आयोगाला पूर्णवेळ अध्यक्ष नव्हता. त्यामुळे आयोगावर पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर, राज्य सरकारने एमपीएससीचे सेवानिवृत्त अध्यक्ष किशोर राजे-निंबाळकर यांची नोव्हेंबर 2021 मध्ये नियुक्ती केली होती.
निंबाळकरांच्या कार्यकाळात आयोगाचे विक्रमी काम
किशोर राजे-निंबाळकर यांना 1 वर्ष 11 महिन्यांचा एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिळाला. या काळात आयोगाने विक्रमी काम केले. 2021 मध्ये आयोगाने 275 जाहिराती दिल्या. यावेळी 5 हजार 47 एवढी पदसंख्या होती, तसेच 779 मुलाखती घेतल्या आणि 99 शिफारशी केल्या. यानंतर 2022 मध्ये आयोगाने 108 जाहिराती दिल्या.
तेव्हा 6576 एवढी पदसंख्या होती. या काळात 7419 मुलाखती घेतल्या आणि 4977 शिफारशी केल्या. तसेच, 2023 मध्ये 60 जाहिराती दिल्या. ज्यांची पदसंख्या होती 10 हजार 529 होती. या काळात 9335 एवढ्या मुलाखती घेतल्या आणि 3928 नोकरीसाठी शिफारशी केल्या.