मुंबई – बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीचा नुकताच अपघात झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री परळीत ही घटना घडली असून या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली. ते परळीला परतत असताना त्यांच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला.
दरम्यान, सध्या धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतंच विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली असून त्यांच्या तब्येची चौकशी केली. मात्र, या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी ते म्हणाले, “धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर आहे. कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये. मी अनेकदा सांगितलं की रात्रीचा प्रवास करू नका. रात्रीच्या प्रवासात नेहमी अपघात होत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी रात्रीचा प्रवास टाळावा”. असं अजित पवार यावेळी म्हणाले.
आपल्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणतात…
“मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये’.