Devendra Fadnavis । Raj Thackeray । Gudi Padwa Melava : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दिला आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, अशी घोषणा त्यांनी आज मंगळवारी (दि. 9 एप्रिल) शिवतीर्थावर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात केली आहे.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महायुतीला पाठिंबा देणार की नाही? राज ठाकरेंनी महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला तर मनसेला लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून किती जागा दिल्या जाणार? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांवर आज स्वत: राज ठाकरेंनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, मला कशाचीही अपेक्षा नाही, देशाच्या भवितव्यासाठी सक्षम नेतृत्व हवे म्हणून केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार आहे.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला. तुमचा पक्ष फोडला म्हणून तुम्ही आरोप करता, पण सत्तेत असताना तुम्ही मलाई खाल्ली नाही का, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना केला.
मनसे भाजप, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं यावेळी राज ठाकरेंनी म्हंटल आहे. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत त्यांचे आभार मानले आहेत.
सस्नेह स्वागत !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत,
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी,
भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी,
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत…— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 9, 2024
फडणवीस म्हणाले की, “सस्नेह स्वागत ! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे.
आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या! या आशयाचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.