Devendra Fadnavis – नुकत्याच पार पडलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (madhya pradesh election) महिलांची मते (Women’s vote) निर्णायक ठरतील. तेथील महिलांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाप्रती प्रचंड उत्साह दाखवला आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.
मध्यप्रदेशातील 230 जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना, त्यांनी सांगितले की “मध्यप्रदेशात 40 जागांवर निकराची लढत होईल आणि हा देखील एक निर्णायक घटक असेल. मध्यप्रदेशातील 5,60,58,521 मतदारांपैकी 2,87,82,261 पुरुष आणि 2,71,99,586 महिला आहेत.
2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार का, असे पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले की, मी नागपूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार तेलंगणा सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कायदा करण्याच्या विचारात आहे.
या कायद्यात व्यक्ती आणि संघटनांच्या काही बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिकार देणारी तरतूद आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार काम करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाला दिलेली वचनबद्धता पूर्ण केली जाईल असे त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह डिसेंबरमध्ये गडचिरोलीतील कोनसारी स्टील प्लांटचे उद्घाटन करतील, असेही फडणवीस म्हणाले. आगामी काळात जिल्ह्यात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.