कोरेगाव – कोरेगाव शहरासाठी नगरपंचायतीने जाहीर केलेला प्रारूप विकास आराखडा सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेचे नुकसान करणारा आहे. तो रद्द करण्यासाठी सर्वांनी पक्ष बाजूला सारून एकत्रित लढा देण्याचा निर्धार करुया. या लढ्याला आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन बाधित ग्रामस्थांनी केले.
येथील बाजारपेठेतील मारुती मंदिरात बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांच्या बैठकीत अनेकांनी मते व्यक्त केली. कोरेगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा नुकताच नगरपंचायतीने जाहीर केला. त्या विकास आराखड्यात सर्वसामान्य शेतकरी आणि गरीब जनतेवर अन्याय झाल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या चार दिवसांपासून प्रारूप विकास आराखडा रद्द करावा, यासाठी आंदोलनची भूमिका घेतली आहे. आराखडा तयार करताना गावाचा सर्व्हे व्यवस्थित केला नाही. त्यासाठी कोणतीही कमिटी केली नाही. सर्व्हे करताना नगरपंचायत कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली नाही. त्याचे व्हिडीओ शूटिंग केले नाही. प्रत्यक्ष पाहणी केली असती तर ज्या ठिकाणी रस्ते आवश्यक आहे त्या ठिकाणी ते पडले असते. पाहणी न केल्याने नको त्या ठिकाणी रस्ते पडले आहेत. अनेक ठिकाणी पहिले रस्ते आहेत ते रस्ते न दाखवता नवीन रस्त्याचा घाट घातला आहे. हा सर्व्हे नगरपंचायतीच्या कार्यालयात बसून केला आहे. त्यामुळे तो चुकीचा झाला आहे. त्यामुळे तो रद्द झाला पाहिजे. त्यासाठी सोमवारपासून सर्वांनी कागदपत्रासह हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.
आमदार महेश शिंदे यांनी दिलेल्या शब्दानुसार दि. 30 जानेवारी रोजी नगरपंचायतीच्या मासिक सभेत विकास आराखडा रद्द करण्यासाठी 17-0 असा ठराव करून घ्यावा. सभेदिवशी सर्वांनी नगरपंचायतीत सर्वांनी जमावे, असे आवाहनही करण्यात आले. विकास आराखडा तयार करणाऱ्या संस्थेने यापूर्वी कोणत्या गावाचे सर्वेक्षण केले आहे. त्याच्या कामाचा अनुभव काय आहे हेदेखील पाहणे गरजेचे आहे. शेजारी कोणता विकास आराखडा पडला आहे, त्याचे नियम काय आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे. हरकती घेण्याची माहिती लोकांना मिळण्यासाठी गावात दोन बोर्ड लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हरकती घेण्यासाठी नगरपंचायत आणि भूमापन कार्यालयाने कागदपत्रे द्यावीत, अशी मागणी करत हा विकास आराखडा शेतकरी आणि ग्रामस्थांवर अन्याय करणारा आहे. तो रद्द करण्यासाठी आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे व नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. या बैठकीस ऍड. किरण फाकडे, प्रतिभाताई बर्गे, संजय पिसाळ, किशोर बर्गे, अमर बर्गे, प्रीतम बर्गे, हेमंत बर्गे, हणमत बर्गे, दिनेश बर्गे, डॉ. होळ, सम्राट बर्गे यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.