सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न
जम्मू – सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला घडवण्याचा कट नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये अयशस्वी ठरला. आत्मघाती हल्लेखोर बनून तो कट अंमलात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या दहशतवाद्याला सोमवारी अटक करण्यात आली.
ओवैस अमिन राथेर असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. एका प्रवासी वाहनात बसून काश्मीर खोऱ्याच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले. पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केली. ओवैसला अटकेनंतर बनिहालमधील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी आठ दिवसांसाठी पोलीस कोठडीत केली. तो हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे समजते. शनिवारी त्याने पुलवामासारखा हल्ला घडवण्याचा प्रयत्न केला. सीआरपीएफच्या वाहनाला कार धडकावून स्फोट घडवण्याची त्याची योजना होती. तो स्फोट होण्यापूर्वी ओवैसने कारमधून बाहेर उडी घेतल्याचे स्पष्ट झाले. कारची धडक सीआरपीएफच्या वाहनाला बसली नाही. मात्र, कारच्या स्फोटामुळे सीआरपीएफच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले.