भारताकडून “सुखोई 30′ तर पाक कडून “एफ-16’विमाने तैनात
नवी दिल्ली – पंजाबमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ खेमकरन भागात पाकिस्तानी ड्रोन दिसल्यामुळे दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांनी काही काळ सज्जतेचा पवित्रा घेतला होता. भारत आणि पाकिस्तानची लढाऊ विमाने सीमाभागात समोरासमोर येण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.
सीमा भागात पाकिस्तानी ड्रोन आढळल्याबरोबर हवाई दलाने आज दोन सुखोई-30 विमाने पाठवली. याच सुमारास सीम अभागात पाकिस्तानचीही दोन “एफ-16′ विमाने आढळून आली होती, अशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही देशांची लढाऊ विमाने आमने सामने आल्यानंतर पाकिस्तानी ड्रोन माघारी बोलावण्यात आले. त्यामुळे मोठा संघर्ष टाळला गेला.
भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केल्यापासून गेल्या चार आठवड्यांत सीमा भागात वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानची ड्रोन आढळली गेली आहेत. गेल्या महिन्यात पाकिस्तानचे ड्रोन राजस्थानच्या गंगानगर भागात भारतीय लष्कराने पाडले होते. तर गेल्याच महिन्यात “सुखोई-30′ लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या सीमेजवळ बिकानेर भागात हवाई क्षेपणास्त्राचा मारा करून पाक लष्कराचे ड्रोन पाडले होते. भारताने बालाकोट भागात जैश ए मोहम्मदच्या अड्डयांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमधील हवाई दलांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.