वडगाव मावळ – आमदार अतुल भातखळकर यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर केलेले चुकीचे आरोप तसेच समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 13) मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने “जोडे मारो’ आंदोलन केले. तसेच आमदार भातखळकर यांच्यावर फौजदारी गुन्हा करण्याच्या मागणीचे निवेदन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना दिले.
या वेळी मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल शिंदे, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, संजय गांधी समितीचे अध्यक्ष नारायण ठाकर, युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष सुवर्णा राऊत, रायगड जिल्हा निरीक्षक ऍड. रूपाली दाभाडे, कामशेत शहराध्यक्ष गजानन शिंदे आदी उपस्थित होते.
बबनराव भेगडे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची ही कुट नीती असून विकासापेक्षा समाजामध्ये विद्रोह निर्माण करायचा म्हणून आमदार भातखळकरांनी हे वक्तव्य केले आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. मावळची जनता भाजपच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही. भातखळकरांनी कोणतीही माहिती न घेता केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.