नवी दिल्ली – करोनाच्या अन्य विषाणुंच्या तुलनेत डेल्टा प्लस विषाणुची फुफ्फुसाच्या टिश्युंवरील मारक क्षमता अधिक असल्याचा निष्कर्ष करोना वर्किंग ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी मांडला आहे.
तथापि त्यामुळे हा विषाणु मोठी आरोग्य समस्या निर्माण करतो किंवा तो अधिक वेगाने पसरतो असा निष्कर्ष मांडता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 11 जून रोजी या विषाणुचा शोध लागला आणि तो चिंतेची बाब असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
आत्तापर्यंत संपुर्ण देशातील 12 राज्यांमध्ये या विषाणुची लागण झाल्याच्या एकूण 51 केसेस आढळून आल्या असून त्यात महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आज पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की अजून या विषाणुच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास सुरू आहे. पण त्याचे अधिक रूग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात येईल. तथापि लसींचा ज्यांनी एक किंवा दोन डोस घेतले आहेत त्यांच्यावर या विषाणुंचा परिणाम सौम्य असेल असा अंदाज आहे.
तथापि त्याच्या प्रादुर्भावावर आपल्याला आता अधिक लक्ष ठेवावे लागले असे त्यांनी म्हटले आहे. या विषाणुंच्या अस्तित्वाबाबत आणि त्याच्या रचनेबाबत आपल्या आधीच नीट माहिती समजल्याने आता त्यावर नियंत्रण ठेवणे किंवा त्याचा प्रादुर्भाव रोखणे हे तुलनेने अधिक सोपे जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे