देहूरोड – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रिक्त झालेल्या पदावर नामनिर्देशित सदस्य (केंद्र सरकारद्वारा नियुक्त लोक प्रतिनिधी) नियुक्तीचे आदेश आले आहेत. याबाबतचे पत्र बोर्डाला प्राप्त झाले असून, सदर प्रक्रिया 19 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड यासह देशातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुदत संपल्याने बरखास्त करण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट कायदा 2006 अन्वये निवडणुका होईपर्यंत त्रिसदस्यीय बोर्ड असणार आहे. यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व एक केंद्र सरकारद्वारा नियुक्त लोकप्रतिनिधी यांचा समावेश असेल. केंद्र सरकारद्वारा नियुक्त करण्यात येणारा लोकप्रतिनिधी हा शासकीय व्यक्ती (कर्मचारी) असणार आहे. अशा एकूण तीन नावांचे पॅनेलची शिफारस दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख यांच्याद्वारे करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र रक्षा संपदा महानिर्देशालय नवी दिल्ली यांनी बरखास्त झालेल्या देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रधान निर्देशालयांना पाठवले आहे.
नामनिर्देशित सदस्यत्वासाठी (शासकीय व्यक्ती सोडून) इच्छुकांकडून अर्ज मागविणे, प्राप्त अर्ज छाननी करून पात्र अर्ज अध्यक्षांकडून दक्षिण विभागाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यासाठी होणारी प्रक्रिया 19 मार्चपर्यंत पूर्ण करावी असेही आदेशित करण्यात आले आहेत, अशी माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत यांनी दिली आहे.