शेवगाव, दि. 23 – शेवगावचे आडत व्यापारी दगडूशेठ ऊर्फ गोपीकिसन गंगाभिसन बलदवा यांचे मारवाडी गल्लीतील राहत्या घरी चोरट्याने चोरीच्या उद्देशाने शुक्रवारी (दि. 23) पहाटे तीन-चारच्या दरम्यान घरफोडी केली. या वेळी चोरट्याने केलेल्या जबरदस्त मारहाणीत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुष्पा हरिकिसन बलदवा (वय 60) व दगडूशेठ ऊर्फ गोपीकिसन गंगाभिसन बलदवा (50) असे मृत दीर-भावजयीची नावे असून, सुनीता गोपीकिसन बलदवा (48) गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक विलास पुजारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. थोड्याच वेळेत श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब युनिट व्हॅन, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकदेखील येथे दाखल झाले.
जखमी सुनीता बलदवा यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, या घटनेबाबत अधिक माहिती देताना, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की, या घटनेच्या प्राथमिक तपासात केलेली चौकशी, तसेच उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका अज्ञात चोरट्याने हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. असे असले तरीही इतर साथीदार होते का? याचा तपास पोलीस घेत आहेत .
या घटनेत हत्यार म्हणून वापरलेली लोखंडी टॉमी व कटावणी तेथे सापडली असून, सुमारे 4 लाख 95 हजारांचा ऐवज व रोख रक्कम चोरीला गेल्याचे राकेश ओला यांनी या वेळी सांगितले. चोरी गेलेल्या ऐवजामध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करताना काही धागेदोरे हाती लागल्याचे, त्यांनी माध्यमांशी बोलताना सूचित केले आहे.
घटनेची माहिती मिळताच, माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी येथे येऊन घटनास्थळाला भेट दिली. बलदवा कुटुंबाचे सांत्वन केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची शेवगाव पोलीस ठाण्यात भेट घेत चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा, अशी मागणी केली. या वेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे होते. तसेच माहेश्वरी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक ओला यांची भेट घेऊन या घटनेचा तपास लवकरात लवकर लावून संबंधित चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी केली .
तपासाची चक्रे वेगाने फिरवत, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, गणेश वारुळे आदी शहरात ठाण मांडून होते.
व्यापाऱ्यांचा अघोषित कडकडीत बंद
चोरट्यांच्या मारहाणीत आडत व्यापारी बलदवा व त्यांच्या भावजयीचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच व्यापारी व नागरिकांनी त्यांच्या घराच्या परिसरात गर्दी केली. त्यानंतर घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवहार, दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला.
हा योगायोग की पाळत?
बलदवा यांच्या एका नातेवाइकाने तीर्थयात्रेला जाताना मृत गोपीकिसन यांच्याकडे त्यांचा काही सोन्याचा ऐवज ठेवला होता. तोही चोरीला गेला. ते नातेवाइक तीर्थयात्रेतून मागे फिरले असून, ते आल्यानंतरच चोरीस गेलेल्या ऐवजाचा नेमका आकडा समजू शकेल, तसेच या माहितीमुळेच चोरी झाली असावी, अशी येथे दबक्या आवाजात चर्चा होत होती.