मंचर, (प्रतिनिधी) -पेठ (ता. आंबेगाव) येथील महानुभाव पंथाचे वयोवृद्ध साधू भिमाजी कुंडलिक साबळे हे राहत असलेल्या पत्र्याच्या शेड मधील श्रीकृष्णाची मूर्ती व दानपेटी एका चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्या चोरट्याच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत गेल्या तीन महिन्यात मंचर पोलिसांनी संशयित आरोपीकडे आणि चोरी झालेल्या घटनास्थळी जाऊन कुठलीही चौकशी केली नाही. उलट संशयित आरोपीने पोलिसाकडे दिलेली तक्रार मागे घ्या. अन्यथा जीवे मारू, असा दम दिल्याने साधू साबळे हे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मंचर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ गावच्या हद्दीत सौरंग्या डोंगर येथील एकमुखी दत्त मंदिराजवळ भिमाजी कुंडलिक साबळे हे महानुभव पंथाचे साधू महाराज गेली 13/14 वर्षापासून वास्तव्यास आहेत. ते देवाची भक्ती करून उदरनिर्वाह करतात. 20 नोव्हेंबर 2023 रोजी ते नागपूर येथे देवाला गेले होते. त्यावेळी त्यांचा तिकडे तीन आठवडे मुक्काम होता.
त्यानंतर ते 6 डिसेंबर 2023 रोजी परत आले असता त्यांच्या मठातील श्रीकृष्णाची मूर्ती व दानपेटी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता आजूबाजूच्या लोकांनी तुमच्याबरोबर असलेला अजय कांचन दीक्षित (रा. उरुळी कांचन) हा मठावर येऊन गेल्याचे सांगितले.
भीमाजी साबळे यांची अर्धा किलो वजनाची दगडाची मूर्ती. त्यावर एक ग्रॅम सोन्याचा टोप व लोखंडी दानपेटी अजय दीक्षित यांनी नेल्याचा संशय असून त्यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर संशयित आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांनी रात्रीच्या वेळी येऊन तक्रार मागे घ्या. अन्यथा जीवे मारू. असा दम दिल्याने मी घाबरलेल्या अवस्थेत आहे.
त्या संदर्भात 13 जानेवारी 2024 रोजी मंचर पोलीस ठाण्यात माझी फिर्याद घेतली नाही. अखेर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेउन मंचर पोलिसाच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचल्याने आढळराव पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना फोन करून फिर्याद दाखल करण्यास भाग पाडले.
मंचर पोलीस संशयित व्यक्तीची कुठलीही चौकशी करत नाही व माझी मूर्ती व दानपेटी मला मिळवून देत नाहीत. ही मूर्ती दगडाची असली तरी माझ्यासाठी सर्वस्व आहे. तिच्यात माझे अस्तित्व आहे. मूर्ती चोरीला गेल्यापासून मला अन्न पाणी गोड लागत नाही. माझा देव मला परत आणून द्या.-भिमाजी साबळे, साधू
संबधित संशयित आरोपीला पकडण्यासाठी मंचर पोलिसाचे पथक पाठून कार्यवाही केली जाईल. साधू महाराजांच्या भावना तीव्र आहे. त्यांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहे. -अरुण फुगे, पोलीस निरीक्षक मंचर