राहु – राहू बेट (ता. दौंड) परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार कूल समर्थकांनी बाजी मारली आहे. येथील द हिटने, देवकरवाडी आणि पाटेठाण या तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार कूल समर्थकांनी विजय मिळविला आहे. यामध्ये पाटेठाणचे सरपंचपद उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. बाकी दोन्ही ठिकाणी आमदार कूल समर्थक सरपंच विजयी झाले आहेत.
दहिटनेच्या सरपंचपदी कूल गटाच्या आरती गायकवाड या 163 मतांनी, तर देवकरवाडीमध्ये तृप्ती मगर या 367 मतांनी विजयी झाल्या आहेत. पाटेठाणमध्ये आमदार गटाला नऊपैकी आठ जागा मिळाल्या कुूल गटाला मिळाल्या असून, सरपंचपद रिक्त आहे. देवकरवाडीमध्ये विरोधी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. सरपंच आणि इतर सदस्य हे आमदार कूल गटाचे विजयी झाले आहेत. दहिटनेमध्ये सरपंचपदाबरोबर नऊ पैकी सात जागा आमदार कूल गटाकडे, तर दोन जागा या विरोधी गटाकडे गेल्या आहेत.
दोन जागांवर वर्चस्व वाढले –
तिन्ही ग्रामपंचायतींपैकी देवकरवाडी व पाटेठाण या ग्रामपंचायती माजी आमदार रमेश थोरात यांच्या ताब्यात होत्या, तर दहिटने ही आमदार कूल यांच्या ताब्यात होती; परंतु आज लागलेल्या निकालात दहिटने ग्रामपंचायत आमदार कूल यांच्याकडे कायम राहून पाटेठाण व देवकरवाडी या दोन्ही ग्रामपंचायती आमदार कूल यांच्याकडे आल्या आहेत. म्हणजेच तिन्ही ग्रामपंचायतींवर आमदार कुलांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.