नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड या ईशान्येकडील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार त्रिपुरात 16 फेब्रुवारीला आणि नागालॅंड आणि मेघालयात 27 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल. तिन्ही राज्यांचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होतील.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत हा कार्यक्रम जाहीर केला. या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 16 फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार असून आणि नागालॅंड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
नागालॅंड, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांची मुदत अनुक्रमे 12, 15 आणि 22 मार्च रोजी संपत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये एकत्रितपणे 62.8 लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यात 31.47 लाख महिला मतदार आहेत. त्रिपुरात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आहे तर नागालॅंड मध्ये भाजप आघाडीचे सरकार आहे. मेघालयात कोनार्ड संगमा यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल पिपल्स पार्टी आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजपचा व त्यांच्या आघाडीचा कस लागणार आहे.
#WEF2023 : दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका; 1 लाख 37 हजार कोटींचे सामंजस्य करार – मुख्यमंत्री शिंदे
ईशान्येकडील ही राज्ये दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. त्या राज्यांमध्ये भूभागाशी संबंधीत अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे तेथे निवडणूक व्यवस्था निर्माण करणे हे नेहमीच एक आव्हान असते. तथापि आम्ही तिन्ही राज्यांचा प्रत्यक्ष दौरा करून तेथील निवडणूकीच्या तयारी बाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आहे अशी माहितीही राजीवकुमार यांनी दिली.