पिंपरी – बदलत्या वातावरणाचा फटका लहान मुलांना बसत असून अॅडिनो व्हायरसच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील बालरोग विभागात उपचारासाठी गर्दी होत आहे. आठवड्यात सुमारे तीन बालके अत्यावस्थ होत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या आजाराचे रुग्ण आढळत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.
वातावरणातील बदलाचा फटका शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर जाणवत आहे. त्याचा परिणाम आता शहरातील लहान बालकांवरही दिसत आहे. बालकांना व्हायरल इन्फ्केशनचा त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये अॅडिनो व्हायरसचे प्रमाण अधिक आढळत आहे. या आजारामध्ये फुफ्फुसाला इन्फ्केशन होत आहे. पाणी साठणे, मेंदूवर प्रादूर्भाव होणे आदी त्रास जाणवत आहेत. वायसीएम रुग्णालयात बालरोग विभागात दिवसाकाठी सुमारे ९० ते १०० रुग्ण व्हायरल इन्फ्केशनच्या त्रासाचे येत आहेत. यामध्ये आठवड्याला तीन रुग्ण गंभीर होत आहेत. अनेकांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवावे लागत असल्याची माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली.
नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेतल्यास मुले बरे देखील होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोमट पाणी पिणे, मास्क वापरणे, मुले आजारी असल्यास शाळेत न पाठविणे, डोळ्यांना, तोंडाला हात लावू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत.
वायसीएम रुग्णालयाकडून खबरदारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असली, तरी उपचाराची खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या रुग्णांना ६० बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. यामध्ये २५ बेड नवजात शिशू अतिदक्षता विभाग, २५ बेड जनरल वाॅर्डमधील बालकांसाठी तर पाच बेड बालरोग अतिदक्षता विभागासाठी ठेवण्यात आले आहेत. येणाऱ्या अत्यावस्थ बालकांवर तत्काळ उपचार करण्याची सुविधा निर्माण केली आहे.
बदलत्या वातावरणामुळे अॅडिनो व्हायरसच्या आजाराचे बालक आढळत आहेत. काही बालके अत्यावस्थ देखील होत आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांमार्फत उपचार केले जात आहेत. मात्र नागरिकांनीही योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. मास्क वापरणे आवश्यक आहे. दोन महिने हे रुग्ण अधिक आढळले असले तरी आता ती संख्या कमी होत आहे.
– डाॅ. दीपाली अंबिके, बालरोगतज्ज्ञ, वायसीएम.