नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड शनिवारी ३ जून रोजी विवाह बंधनात अडकला. चेन्नई सुपर किंग्जसाठी यंदाचे आयपीएल शानदार खेळणाऱ्या ऋतुराजने उत्कर्षा पवारसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ऋतुराजची पत्नी उत्कर्षा देखील क्रिकेटर आहे. ऋतुराजने विवाह सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ऋतुराजने लग्नासाठी टीम इंडियातून रजा घेतली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली होती, परंतु त्याने आपले नाव मागे घेतले. ऋतुराजच्या जागी यशस्वी जैस्वाल टीम इंडियामध्ये सामील झाली.आयपीएल फायनलनंतर ऋतुराज आणि उत्कर्षा एकत्र दिसले होते. ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा विवाह सोहळा महाबळेश्वरमध्ये संपन्न झाला.
ऋतुराजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. यावेळी दोघेही खूप आनंदी असल्याचे समजते. दोघांनी एकमेकांसोबत विविध पोज देत यावेळी फोटो काढले आहेत. ऋतुराजने यावेळी वापरलेला whatamatch हा हॅशटॅग चांगलाच लक्षवेधी ठरतोय. या फोटोंवर अनेकांनी दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
कोण आहे उत्कर्षा पवार
उत्कर्षा पवारचा जन्म १३ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला. ती एक क्रिकेटरही आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती महाराष्ट्राकडून खेळायची. उत्कर्षा ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करते. ती 18 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र संघाकडून शेवटचा सामना खेळली होता. समोर आलेल्या माहितीनुसार उत्कर्षा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (पुणे) येथून शिक्षण घेत आहे.