ऑस्ट्रेलियासाठी जे स्थान सर डॉन ब्रॅडमन यांचे किंवा भारतासाठी जे स्थान विक्रमादित्य सुनील गावसकर यांचे आहे तेच स्थान वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये सर गॅरी सोबर्स यांचे आहे. भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला सराव शिबिरात सोबर्स भेटले. यावेळी समोर उभे राहिलेले सोबर्स खरोखर पाहावत नव्हते. जी अवस्था त्यांच्या क्रिकेटची बनली आहे तशीच म्हणजे ओढग्रस्त अवस्था सोबर्स यांची झालेली दिसली व मनात कुठेतरी कळ उभी राहिली.
एक रुबाबदार फलंदाज ते अत्यंत नेटक्या भाषेत पण क्रिकेटचे अफलातून ज्ञान आपल्या समालोचनातून प्रेक्षकांसमोर मांडणारा हा खेळाडू आता पूर्ण थकला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सोबर्स व गावसकर यांचे वक्तव्य प्रमाण मानले जाते. सोबर्सने केवळ विंडीजला जागतिक वर्चस्व प्राप्त करून दिले तेच गतवैभव ते आजही शोधत आहेत. फलंदाज व गोलंदाजांची खाण म्हणून या देशाकडे पाहिले जात होते आता त्यांच्या संघात जागतिक दर्जाच उरलेला नाही.
त्यांना यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठीही पात्र होता आले नाही व ही खंत सोबर्स यांनी राहुल द्रविडसह सगळ्याच भारतीय क्रिकेटपटूंशी बोलताना व्यक्त केली. मात्र, आता खंत व्यक्त करण्याव्यतिरिक्त ते तरी काय करणार. त्यांचा तो दबदबा ते गतवैभव, तो शोभणारा फलंदाजीतील बेदरकारपणा आता कधीच दिसणार नाही या विचारानेही मन कासावीस होत आहे.
एकेकाळी आपल्या देशात भारतीय संघाने कधीही खेळण्यासाठी येऊच नये असे म्हणणारे त्यांचे क्रिकेट मंडळ आता भारतीय संघासाठी रेड कार्पेट टाकत आहेत. कारण, आज देश कोणताही असो तिथे जर भारतीय संघ खेळायला गेला तरच त्या आयोजक मंडळाला पैसा मिळतो ही वस्तुस्थिती आहे.
सोबर्स यांना हीच गोष्ट कुठेतरी खुपत असेल. कारण ज्या जागतिक क्रिकेटवर त्यांनी राज्य केले त्या संस्थानाचे ते देखील एक राजे होते. आज त्यांच्याच डोळ्यादेखत त्यांच्या क्रिकेटचे मांडलिकत्वही त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे यापेक्षा वेगळी शोकांतिक काय असावी. असो, काळ प्रत्येकाचा येतो व जातो. कधी वेस्ट इंडिजचा होता मग ऑस्ट्रेलियाचा व आता भारताचा आहे. मात्र, काळ कोणताही असो कालातीत व्यक्तींचे महत्त्व कोणत्याही काळात कमी होत नाही.
सोबर्स यांचेही होणार नाही. केवळ एकच अपेक्षा आहे की जोवर सोबर्स आहेत तोपर्यंत त्यांच्या संघाने आपल्या कामगिरीत सुधारणा करुन दाखवावी म्हणजे ते देखील या वयातही टाळ्या वाजवण्यासाठी जमैका, त्रिनिदाद, ऍन्टिग्वा किंवा बार्बाडोसला उपस्थित राहतील व ए मान यु प्ले अ गुड इनिंग असे त्यांच्या एखाद्या फलंदाजाला म्हणतील किंवा यु आर फास्ट बट नॉट मोर दॅन माल्कम (मार्शल) असे खिजवतील.
आम्हाला थट्टा-विनोद करणारे, प्रसंगी संतापलेले परंतू आपल्या देशाच्या क्रिकेटचे भले व्हावे व संघाने गतवैभव मिळवावे याची तळमळ असणारे सोबर्स पुन्हा एकदा पाहायचे आहेत. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर आलेला तजेला आणि नजर पुसट होत असलेल्या डोळ्यांतील चमक पुन्हा पाहायची इच्छा आहे.