पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – भाजपच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मंत्री महोदय आले होते. या मंत्र्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. मात्र हे फलक लावताना जाणीवपूर्वक काळेवाडी स्मशान भूमीच्या फलक पूर्णपणे झाकून ठेवला होता, सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांनी केला.
बीआरटी रोड लगत काळेवाडी येथे स्मशानभूमी आहे. रस्ता मोठा झाल्याने अनेकदा स्मशानभूमीचा हा फलक दिसत नाही. त्यामुळे बाहेर गावाहून अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना स्मशानभूमी कोठे आहे, हे शोधावे लागते. अशावेळी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेला हा फलक उपयोगी पडतो. मात्र शहरात विशेषतः काळेवाडी परिसरात होणाऱ्या कार्यक्रम आणि नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात येणाऱ्या फलकांसाठी बीआरटी मार्ग महत्वाचा असतो.
दोन दिवसांपूर्वी भाजपचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुंनगंटीवार हे देखील शहरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फलक लावले होते. त्यामध्ये काळेवाडी येथील स्मशान भूमीच्या फलकासमोरच स्वागताचा फलक लावला होता. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांनी सांगितले. गायखे यांनी स्वागत फलकाबाबत तक्रार केल्यावर अतिक्रमण विरोधी पथकाने हा फलक हटविला.
नामफलकाची कमान लावण्याची मागणी
सध्या काळेवाडी स्मशान भूमीजवळ लावण्यात आलेला फलक अतिशय छोटा आहे. त्यातच राजकीय नेते व इतरजण त्यावर जाहीरात फलक लावतात. त्यामुळे हा फलक दिसेनासा होतो. त्यामुळे याठिकाणी स्मशान भूमी नाव असलेली कमान उभारावी, अशी मागणी संजय गायखे यांनी महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयातील सोमवारी (दि. 10) झालेल्या जनसंवाद सभेत केली.