पिंपरी – विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी तब्बल 50 हजारांची लाच घेणारा पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई आज (सोमवारी, दि. 22) वाकड पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.
पोलीस नाईक सचिन कुबेर जाधव (वय 37) असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जाधव हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 498 प्रमाणे विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तक्रारदारास अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. अटकेची प्रक्रिया पूर्ण करून जामिनावर सोडण्यासाठी तसेच गुन्ह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्यासाठी पोलीस नाईक सचिन जाधव याने दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले.
दरम्यान, तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सोमवारी सापळा लावला लावून लाचेच्या मागणीबाबत पडताळणी केली. त्यानंतर पोलीस नाईक सचिन जाधव याला 50 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून गेल्या अडीच वर्षात आत्तापर्यंत 25 जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यातील 24 गुन्ह्यांमध्ये पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे.