नवी दिल्ली – आयसीएमआरने घातक अशा ‘म्युकरमायकोसिस’बाबत सूचना जारी केली असून, त्यात असे सांगण्यात आले आहे की अनियंत्रित मधुमेह आणि उपचाराच्या दरम्यान आयसीयूमध्ये जास्त काळ राहिलेल्या करोना रुग्णांवर म्युकरमायकोसिसचा उपचार वेळेवर झाला नाही, तर ते धोकादायक ठरू शकते.
हा संसर्ग झाल्यास डोळे, गाल आणि नाक यांच्यावर परिणाम होतो. म्युकरमायकोसिसमुळे फुफ्फुसांना संसर्ग होतो आणि श्वास घेण्यात अडचणी येतात. लवकर या आजारावर उपचार केले नाही, तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असल्यामुळे त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.
करोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे रुग्णातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू रुग्णाच्या नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकारशक्ती संतुलित नसेल तर म्युकोरमायकोसिस या बुरशीची वाढ होते.
म्युकोरमायकोसिसची चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे, नाक दुखणे, रक्ताळ किंवा काळसर जखम ही सर्व लक्षणे आहेत. करोनामुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण सातत्याने तपासावे. कोणत्याही औषधांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आयसीएमआरच्या निर्देशांचे पालन करावे.