चिंबळी- अक्षयतृतीया सण अवघ्या दोन दिवसांवर आला असल्याने खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मरकळ व कुरुळी येथील कुंभारवाड्यात कराकेळी (खण) विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, एका कराकेळी खणाची किंमत 30 रुपये असल्याचे कारागीर आण्णा माळशिकर (कुंभार) यांनी सांगितले. या वर्षी गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण राज्यात करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने या व्यवसायावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे.
दरवर्षी अक्षयतृतीया सण जवळ आला की, एक ते दोन महिने आधीपासूनच कराकेळी खण बनविण्याची लगबग सुरू होते आणि या परिसरासाठी जवळपास एक हजारापर्यंत कराकेळी बनवावी लागते. मात्र, यावर्षी चारशे ते पाचशे खण बनवले आहेत. करोनाचे सावट या व्यवसायवर देखील दिसून येत असून वर्षातून एकदा विक्री होणाऱ्या या खणांच्या आर्थिक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होणार आहे.