नवी दिल्ली- भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणारे मुकेश अंबानी यांच्या मालमत्तेची किंमत केवळ दोन महिन्यात 28 टक्क्यांनी घसरून 48 अब्ज रुपये झाली. करोना साथीमुळे शेअर बाजारात झालेल्या पडझडीमळे ही हानी अंबानी यांना सोसावी लागली आहे.
हारून या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या करोनाच्या साथीचा दोन महिन्यात झालेला संपत्तीवरील परिणाम या विशेष अहवालात ही माहिती उघड झाली आहे. या घसरणीमूळे जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानी यांचे स्थान नवव्या स्थानावरून 17 व्या स्थानावर गेले आहे. फ्रेंच फॅशन कंपनी “एलव्हीएमएच’च्या बर्नाड अर्नाल्ट यांच्यानंतर संपत्ती गमावणाऱ्यांत अंबानी यांचा क्रमांक लागतो. बर्नाड यांनी 30 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली.
अंबानी यांच्या पाठोपाठ गौतम अदानी यांची संपत्ती सहा अब्ज डॉलर्स किंवा 37 टक्क्यांनी कमी झाली. एचसीएल टेक्नॉलॉजीचे शिव नादर यांच्या संपत्तीत पाच अब्ज डॉलर्सची कमी झाली तर उदय कोटक यांनी चार अब्ज डॉलर्स गमावले, असे या अहवालात म्हटले आहे. टॉपच्या व्यावसायिकांना शेअर बाजारातील पडझडीचा फटका 26 टक्के बसला तर रुपयाचे डॉलर्सच्या तुलनेत अवमुल्यन झाल्याने 5.2 टक्के फटका बसला, असे हारूणचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक अनस रहमान यांनी सांगितले.
हारूनचे अध्यक्ष रूपर्ट हूगवर्फ म्हणाले, या दोन महिन्यात गमावलेली संपत्ती ही दोन पेक्षा अधिक वर्षांच्या कमाईपेक्षा अधिक आहे. जगातील सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींच्या संपत्तीत 12.6 टक्के म्हणजे 408 अमेरिकन डॉलर्स एवढी घट झाल्याचे त्यांनी सांगितले.