बिजिंग – चीनच्या राजधानीतच करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने तेथील मॉल आणि निवासी इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊन लावून तेथे व्यापक तपासणी मोहीम राबवण्यात येत असून प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यात देशांत करोनाची साथ वारंवार उद्भवत असल्याने प्रशासन अत्यंत सतर्क आहे.
बिजिंगच्या मध्यवर्ती भागात करोनाचे सहा नवे बाधित आढळले. चाओयंग आणि हाइडिअन भागात गुरूवारी सकाळी हे बाधित सापडले. या बाधितांच्या निकटच्या संपर्कात आलेले सर्व जण जिलीन प्रांतातील असल्याचे सांगण्यात आले.
या बाधितांच्या निकटच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती राफेल सिटी मॉलमध्ये जाऊन आल्याचे निष्पन्न झाल्याने हा मॉल बंद करण्यात आला आहे. त्याचे बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून आतील सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना तपासणी केल्यानंतर सोडण्यात येणार आहे.