पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधितांची संख्या दोन आठवड्यापासून कमी होण्यास सुरूवात झाली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज दिवसभरात 22 जणांना करोनाची लागण झाली आहे. सोमवारी (दि. 4) शहरामध्ये अवघ्या एका रुग्णाची नोंद झाली होती. तर त्यानंतर मंगळवारी 8, बुधवारी 9 व गुरूवारी 16 बाधितांची नोंद झाली होती. मात्र आज पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.
शुक्रवारी (दि. 8) शहरात 22 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 3 लाख 59 हजार 304 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील एकाही बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. तसेच गेल्या 24 तासात देखील एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4624 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 7 बाधित रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 55 हजार 327 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये एकाही रुग्णावर उपचार सुरू नाही. तर गृहविलगीकरणात 84 बाधितांवर उपचार सुरू आहेत.