नवी दिल्ली – काश्मीर विद्यापिठाचा (Kashmir University) दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यांचच्या उपस्थितीत पार पडला. काश्मीरच्या जबाबदार तरुणांचा देशाला अभिमान आहे. काश्मीर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सामाजिक सेवेतही सक्रीय सहभाग घ्यावा. त्यामुळे ते सामाजिक बदल घडवून आणू शकतात आणि इतरांसमोर आपला आदर्श ठेवू शकतात, असे त्या म्हणाल्या. माजी विद्यार्थ्यांनी देशसेवा करून या विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.(Convocation ceremony of Kashmir University)
आपले तरुण जेवढे शिक्षणाच्या आणि शांततेच्या प्रकाशमय दिशेने वाटचाल करतील, तेवढा आपला देश प्रगती करेल. ज्या समाजाचा आणि देशाचा युवक विकास आणि शिस्तीचा मार्ग अवलंबतो, तो समाज आणि देश प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर पुढे जातो, असे त्या म्हणाल्या.
काश्मीर विद्यापीठात 55 टक्के मुली आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या विद्यार्थिनी आपला देश आणि देशाच्या भविष्याचे चित्र दर्शवतात. ‘नारी शक्ती वंदन कायदा’ 2023 हा आपल्या देशातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे एक क्रांतिकारी पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान प्रणालीवर भर देण्यात आला असून, आपल्या तरुणांना त्याबद्दल चांगली माहिती मिळाली, तर त्यांना त्यामध्ये अनेक प्रेरणादायी उदाहरणे दिसून येतील. त्या म्हणाल्या की, आपल्या देशात ज्ञान आणि विज्ञानाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात अनमोल खजिना दडला आहे. आजच्या काळात, टप्प्याटप्प्याने विकसित होत गेलेल्या या ज्ञान प्रणालींचा पुन्हा वापर करण्याचे मार्ग शोधणे, ही शैक्षणिक जगताची जबाबदारी आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.