सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि ग्लोबल टीचर ऍवार्ड विजेते रणजीतसिंह डिसले गुरुजी यांचा पाय खोलात जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. डिसले गुरुजी यांच्याकडून जिल्हा परिषद प्रशासन 34 महिन्यांचे तब्बल 17 लाख रुपये वेतन वसूल करणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर अर्थात डाएटकडे प्रतिनियुक्तीवर असताना गैरहजर असल्याच्या प्रकरणात डिसले गुरुजी यांच्यावर ही कारवाई होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली.
डिसले गुरुजी यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला असून ते बार्शी तालुक्यातील परितेवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. राजीनामा दिल्यापासून एक महिन्याचा कालावधी हा नोटीस पिरियडचा आहे. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय होणार आहे.
अमेरिका येथील फुलब्राईट या संस्थेकडून डिसले गुरुजी यांना सुमारे साडेसात कोटी रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
त्यांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अमेरिका येथे जाण्यासाठी रजा आवश्यक असल्यामुळे त्यांनी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे रजा मागणी केली होती. यावरून शिक्षणाधिकारी आणि डिसले गुरुजी यांच्यात वाद रंगला होता. याप्रकरणी तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार त्यांना सहा महिन्यांची रजा मंजूर करण्यात आली होती.
आज छत्र्या घेऊन आलो, उद्या याचे भाले होतील
दरम्यान, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर प्रतिनियुक्ती असतानाही डिसले गुरुजी हे डाएट व परितेवाडी येथील शाळेकडे गेले नसल्याचे डाएटकडून जानेवारी महिन्यात सांगण्यात आले होते. यादरम्यान त्यांना 34 महिन्यांची वेतन देण्यात आले. आता नोव्हेंबर 2017 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीतील वेतन त्यांच्याकडून परत घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली. त्यामुळे डाएटकडे प्रतिनियुक्तीवर असतानाचे गैरहजर प्रकरण डिसले गुरुजींना भोवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“अतिवृष्टीमुळे जनता हैराण; नवीन सरकार मात्र मंत्रीमंडळ विस्तारातच व्यस्त”