पुणे -पुणे-नाशिक ग्रीन कॅरिडॉर महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुणे- नाशिक हायस्पीड द्रुतगती रेल्वे मार्गापेक्षा हा कॅरिडॉर पूर्णत: वेगळा असणार आहे.
पुणे-नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याचे नियोजित आहे. या रेल्वे मार्गाची आखणी पूर्ण झाली असून, केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने त्यास मान्यता दिली आहे. तसेच या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम देखील सुरू झाले. अंतिम मान्यतेचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. असे असतानाच या रेल्वे मार्गाच्या आखणी संलग्न पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करणेबाबतचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले होते. त्यावरून हायस्पीड रेल्वे की रस्ता असा वाद सुरू झाला होता. दरम्यान जानेवारी महिन्यात महारेल्वेच्या अधिकाऱ्यांसमावेत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गतीने देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या वादावर पडदा पडला होता.
एमएसआरडीसीकडून नुकतेच पुणे-नाशिक ग्रीन कॅरिडोअर महामार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या सल्लागार कंपनीकडून डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
उद्योगांसाठी लाभदायी
पुणे जिल्हा हे माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. तर नाशिक ही कृषी मालाची बाजारपेठ आहे. अलीकडच्या काळात नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्याची स्थापना झाली आहे. या दोन्ही शहरामध्ये लघू, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व बाबींचा विचार करून आणि समृद्धी महामार्ग या माध्यमातून पुण्याला जोडण्यासाठी हा ग्रीन कॅरिडोअर प्रस्तावित करण्यात आले असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत आहे.
अपेक्षित खर्च
21 हजार कोटी
प्रस्तावित पुणे-नाशिक कॅरिडोअरची लांबी 178 किमी असून प्रकल्पाकरिता अंदाजे भूसंपादनासह अपेक्षित खर्च 21 हजार 158 कोटी एवढा असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी सधारणत: दोन हजार हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.