तनिश सावली गृह प्रकल्पातील सदनिकाधारकाची तक्रार
आळंदी- चऱ्होली खुर्द मधील बांधकाम इमारतीच्या सदनिकेच्या जाहिरात ब्रोशरमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी दाखविल्या प्रमाणे सुविधा दिल्या नाहीत. सदनिकाधारकांकडून कव्हर्ड पार्कींगसाठी एक लाख रुपयांची तोंडी मागणी करून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल फिऱ्यादीनुसार आळंदी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
आळंदी परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन करून होत असलेली बांधकामे तसेच सदनिकाधारकांना सोयी सुविधा पुरविताना होणारी हेळसांड तसेच वाढीव रकमेची मागणी यामुळे पोलीसांत तक्रारी येण्याचे प्रमाणही वाढले आहे. चऱ्होली खुर्द येथील गृह प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिका विरोधात तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
आळंदी पोलीस ठाण्यात या प्रकरणी योगेश विलास शिंदे (वय 34, रा. चऱ्होली खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राजू मेहता, दिलीप सोळखी, श्रेणिक परमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी हे बांधकाम व्यवसायीक आहेत. चऱ्होलीत तनिश सावली गृह प्रकल्पात फिर्यादी योगेश शिंदे यांनी सदनिका दस्त करून घेतले आहे. शिंदे यांनी ठरलेली खरेदी खताची सर्व रक्कम दिलेली आहे. मात्र, संबंधीत बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी खतात ठरल्याप्रमाणे कव्हर्ड पार्कींग दिले नाही. यासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली शिवाय 37 सदनिकाधारकांना देखील सेवा सुविधा दिल्या नाहीत. यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी आळंदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहे.
- …आणखी तक्रारी येणार
चऱ्होली खुर्द येथे तनिश सावली गृह प्रकल्प मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आला होता. याकरीत सदनिकाधारकांना देण्यात आलेल्या गृह प्रकल्पाच्या माहिती पत्रकात (ब्रोशर) विविध आमिष दाखविण्यात आली होती. याच कारणास्तव या गृह प्रकल्पात सामान्य नागरिकांनी सदनिका घेतल्या. परंतु, संबंधीत बांधकाम व्यावसायिकांकडून काही सुविधांसाठी आणखी वाढीव रकमेची मागणी होऊ लागली. याच कारणातून फिर्यादी योगेश शिंदे यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत आणखी काही तक्रार येण्याची शक्यता असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.