पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर झाली आहे; परंतु काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया आणखी दोन दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार गट आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपामध्ये पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही. पक्षात फक्त इच्छुकांच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.
काँग्रेसने मंगळवारी मुख्य पदाधिकारी, इच्छुक आणि कार्यकर्त्यांची नियोजन आणि आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
गेल्या दोन- तीन दिवसांपासून काही नावांची चर्चा सुरू होती, तसे मेसेजही सोशल मीडियावर फिरत होते. खरेतर पार्लमेंटरी बोर्डाच्या दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर नाव जाहीर होणे अपेक्षित असताना गुरुवारी सायंकाळपर्यंत पुण्याच्या जागेविषयी कोणताच निर्णय जाहीर झाला नाही.
शुक्रवारी (दि. २२ मार्च) काँग्रेसने इलेक्टोरल बाँड आणि काँग्रेस पक्षाचे अकाउंट फ्रीज या विषयावर विविध शहरांमध्ये वार्ताहर परिषदा होणार आहेत. याशिवाय शनिवारी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यामुळे शनिवारीही नाव जाहीर होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या इच्छुकांना आणखी दोन दिवस वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.