हिरडस मावळ – भोर तालुक्यात एकूण 69 सोसायट्या असून, त्यातील काही सोसायटीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तर काही गावांमध्ये दोन गटांत निवडणूक लागल्याचे दिसत आहे. त्यातल्या त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षातच जास्त चुरस पाहायला मिळत आहे. पक्षाच्या अंतर्गत गटांनी एकमेकांसमोर ग्रामदैवतांचे नाव लावून पॅनल तयार करून लढताना दिसत आहेत. सोसायटी निवडणूक म्हणून सहकारातील गावपातळीवरील आर्थिक ताकद आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस पाहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचा पदाधिकाऱ्यांचा पंचवार्षिक कार्यकाल मार्च महिन्यात संपत असल्यामुळे आगामी काळात निवडणुका जाहीर होणार आहेत. याच निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून सध्या होत असलेल्या सोसायटीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी हस्तक्षेप केल्याने रंगत निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. भोर तालुक्यात सध्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकांचे वारे आहे.
ग्रामीण भागातील सहकाराचा कणा असलेल्या सेवा सोसायटीच्या पात्र असणाऱ्या 69 पैकी 35 सोसायटीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील 7 सोसायटीच्या निवडणुका लागल्या होत्या. पैकी 4 सोसायटी निवडणुका पार पडल्या असून, उर्वरीत तीन सोसायटीपैकी दोन रविवारी व एक बुधवारी निवडणूक होणार आहे. 14 सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
आगामी एक दोन महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता आहे.त्यापुर्वी होणाऱ्या सोसायटीच्या निवडणुकीत राजकिय पक्ष निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहत आहेत. या सोसायटी निवडणुकीत तरुण वर्ग इच्छुक असून जमीन नावांवर नसल्याने घरातील लोकांची उमेदवारी भरून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया चालू आहे.
एरवी एकत्र असणारे, नेमके निवडणुकीदरम्यान विरोधात बसून सोसायटीवर आपला हक्क प्रस्थापित करू पाहणारे नंतर पाच वर्षे सोसायट्यांकडेही फिरकत नाहीत, अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. सोसायटीने अवाजवी कर्ज वाटप केल्यामुळे बॅंकांना वसुली होत नसल्याने सहकारी बॅंकांच्या काही शाखा तोट्यात असल्याचे समजते.
सहकारातील महत्त्वाचा कणा असलेल्या चार पाच गावांची मिळून सोसायटी आहेत. मात्र, वेगवेगळ्या गावांतील गावनेत्यांचा विचार एकमेकांना पटत नसल्याने निवडणुका लागत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. आपल्या गावाचे नाव तसेच आपल्या पक्षाच्या ताब्यात सोसायटीचा कारभार राहायला पाहिजे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे.