बंगलुरू – मोदींच्या विरोधात मजबूत राजकीय आघाडी उघडण्यासाठी राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्याशी हातमिळवणी करावी अशी जी सूचना शिवसेनेने केली आहे, त्याचे जाहीर समर्थन कॉंग्रेस राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य दिनेश गुंडुराव यांनी केले आहे.
राहुल गांधी व पवारांच्या बरोबर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊनच भाजपचा मुकाबला केला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. दिनेश गुंडुराव हे कॉंग्रेसचे गोवा, तामिळनाडु आणि पदुच्चेरीचे निरीक्षक आहेत.
हा विषय मार्गी लावण्यासाठी पवार आणि राहुल गांधी हे पुढाकार घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. गुंडुराव म्हणाले की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ एकमेकांचे मित्र पक्ष आहेत.
त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये चांगले बॉडिंग आहे. आता ही आघाडी राहुल गांधी आणि पवार यांनी एकत्र येऊन अधिक व्यापक केली पाहिजे अशी सूचनाही त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेली सूचना चांगली आहे असेही त्यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितले. शिवसेनेने गुरवारी आपल्या मुखपत्रातील अग्रलेखातून ही सूचना केली होती. दिनेश गुंडुराव हे कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्षही आहेत.