नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीत पोहचल्यानंतर ८ दिवसांच्या कालावधीसाठी ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी केली आहे. राहुल गांधी हे योगी सारखं तपस्या करत आहे, असेही सलमान खुर्शीद यांनी म्हटले. सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘भारत जोडो’ यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद येथे सलमान खुर्शीद यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी कडाक्याच्या थंडीत यात्रेमध्ये चालताना राहुल गांधी टी-शर्टचा वापर करतात. यावर खुर्शीद म्हणाले, “आपल्याला जॅकेट घालूनही थंडी वाजत आहे. पण, राहुल गांधी टी-शर्टमध्ये यात्रा करत आहे. मला वाटत राहुल गांधी सुपरमॅन आहेत”,असे त्यांनी म्हटले.
Rahul Gandhi is superhuman. While we are freezing in cold & wearing jackets, he is going out in T-Shirts (for his Bharat Jodo yatra). He is like a yogi doing his ‘tapasya’ with focus: Congress leader Salman Khurshid pic.twitter.com/1wrE0hgBiA
— ANI (@ANI) December 26, 2022
पुढे बोलताना सलमान खुर्शीद यांनी,“प्रभू श्री राम यांची खडाऊ ( पादत्राणे ) खूप लांबपर्यंत जात असे. कधी कधी भरत पादत्राणे घेऊन रामजी पोहचत नसलेल्या ठिकाणी जात असे. भरत यांच्याप्रमाणे आम्ही उत्तरप्रदेशमध्ये पादत्राणे पोहचवले आहेत. आता रामजी ( राहुल गांधी ) सुद्धा येतील,” असे खुर्शीद यांनी सांगितले.
चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी यात्रा स्थगित करण्यासाठी राहुल गांधींना पत्र लिहले होते. यावरूनही खुर्शीद यांनी,”देशात कोणतेही नियम लागू करण्यात आले, तर आमच्यासाठीही ते लागू असतील. पण, करोना म्हणत नाही की मी फक्त काँग्रेससाठी येणार आहे. भाजपासाठी येणार नाही. नियम लागू करण्यात आले, तर त्याचं आम्ही पालन करु,” असे स्पष्ट केले.