चंदीगड – पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आज 86 उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. त्यात मुख्यमंत्री चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धु यांनाही उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
चन्नी हे त्यांच्याच चमकौर साहिब मतदार संघातून लढतील तर सिद्धु हे अमृतसर पुर्व मधून निवडणूक लढवणार आहेत. उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधवा हे डेराबाबा नानक मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी हे अमृतसर मध्य मधून निवडणूक लढवणार आहेत. कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख सुनिल जाखड यंदा विधानसभेची निवडणूक लढवणार नाहीत पण त्यांचे पुतणे संदीप जाखड हे अबोहर मधून लढणार आहेत.
सोनु सूद यांच्या भगिनी मालविका सूद यांना मोगा मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी अलिकडेच कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. वादग्रस्त पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला यांना मनसा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
पंजाब मध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. बाकीच्या ठिकाणचे उमेदवार दुसऱ्या यादीत जाहीर केले जाणार आहेत. पंजाबात एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री चन्नी दोन मतदार संघातून लढणार असल्याचे बोलले जात होते तो विषयही आता निकाली निघाला आहे.