मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या आपल्या पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी देशाच्या विविध भागाचा दौरा करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्या मुंबई दौऱ्यावर आहे. या दरम्यान एका जाहीर कार्यक्रमाला त्या उपस्थित असून या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आणि सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.
यादरम्यान त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील या कार्यक्रमादरम्यान, ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार,भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी या राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. त्यांनी राष्ट्रगीत बसून गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. देशाचे राष्ट्रगीत महत्त्वाचे आहे आणि त्याविषयी ममता बॅनर्जी इतक्या निष्काळजी असतील तर हे चुकीचे आहे. राजकारण यांना देशहितापेक्षा मोठे वाटत आहे.’ असं म्हणत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केले आहे.