मियामे (नायजर) – नायजेरच्या लष्कराने केलेल्या बंडावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी टीका झाल्यानंतर हे बंड करणाऱ्या सुरक्षा दलाच्या कमांडरनी स्वतःला देशाचा नवीन अध्यक्ष घोषित केले आहे. कमांडर अब्देलरेहमान तियानी यांनी शुक्रवारी संध्याकाळी टिव्हीवरून केलेल्या भाषणामध्ये स्वतःला देशाचा नवीन अध्यक्ष घोषित करून टाकले आहे. तियानी यांनी केलेल्या भाषणाच्यावेळी त्यांच्यामागे “प्रिझर्व्हेशन ऑफ होमलॅन्ड’चे अध्यक्ष असा बॅनर लावण्यात आला होता. अध्यक्ष मोहमेद बाझौम्स यांची सत्ता उलथवून टाकणाऱ्यांना नायजरच्या लष्कराने पाठिंबा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी अब्देलरेहमान तियानी यांनी स्वतःला अध्यक्ष घोषित करून टाकले आहे.
सुरक्षा दलांनी केलेल्या बंडामध्ये अंतर्गत गटबाजी सुरू आहे, असा दावा बाझौम्स यांच्या समर्थकांकडून केला जातो आहे.
देशातील सुरक्षा व्यवस्था, गरीब अर्थकारण आणि सामाजिक प्रशासनाच्या खालावलेल्या परिस्थितीपासून देशाला वाचवण्यासाठीच हे बंड करण्यात आले आहे, असे तियानी यांनी म्हटले आहे. सध्याच्या सरकारमुळे नायजेरच्या जनतेला सुरक्षा विषयक आपत्तीतून कोणताही आशेचा किरण दिसत नव्हता, असेही ते म्हणाले.
देशातील रक्तपात टाळण्यासाठी गुरूवारी लष्कराने या बंडाला पाठिंबा जाहीर केला होता. त्याच्या दोन दिवस आगोदरच बाझौम्स यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी अध्यक्षीय प्रासादात ताब्यात घेतले होते.
हे बंड खरे नाही- फ्रान्सचा दावा
हे बंड खरे नाही, असा दावा फ्रान्सकडून केला जातो आहे. हे सत्तापालट अंतिम नाही आणि जर बंडखोरांनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे ऐकले तर बंडखोर नेत्यांसाठी सध्याच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे, असे फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री कॅथरीन कोलोना यांनी शुक्रवारी सांगितले. तर नायजरमधील परिस्थिती वर्णन स्थिरता आणि लोकशाहीवर गंभीर हल्ला असल्याचे युरोपियन युनियनने म्हटले आहे.देशाला दिलेली मदत देखील बंडानंतर स्थगित केली जाऊ शकते असा इशाराही युरोपियन युनियनने दिला आहे.