नेवासा – ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक सोनईमधील गडाख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन गडाखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाकरे म्हणाले, यशवंतराव गडाख यांनी आमदार शंकरराव गडाख हा लढणारा सैनिक मला संकट काळात दिला. त्यांना मी कधीही विसरणार नाही.
माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी सोनई येथील गडाख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी गडाख कुटुंबियांच्यावतीने आमदार शंकरराव गडाख यांनी स्वागत करून उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला.
ठाकरे म्हणाले, गेल्या दीड वर्षांपूर्वीच यशवंतराव गडाख यांना भेटायला यायचे होते. परंतु त्यावेळेस येता आले नाही. यशवंतराव गडाख यांच्या भेटीमुळे नवी ऊर्जा व लढण्यास बळ मिळाले आहे. ही ऊर्जा घेऊन मी माझा संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे ते म्हणाले. यशवंतराव गडाख यांचे नगर जिल्ह्यासह राज्याच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. त्यांचे काम दिपस्तंभाप्रमाणे तेवत आहे व ते सर्वांना प्रेरणादायी असल्याचे ठाकरे म्हणाले.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव गडाख यांच्या हस्ते झाल्याचे व स्व.बाळासाहेब ठाकरे व यशवंतराव गडाख यांच्या मैत्रीच्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. गडाख यांच्या निवासस्थानी भेटीनंतर उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी शनीशिंगणापूर येथे शनीदर्शन घेतले. शनी चौथऱ्यावर जाऊन स्वतःच्या हस्ते विधिवत तेल अर्पण करून ठाकरे यांनी दर्शन घेतले. यावेळी शनिदर्शन घेतल्यानंतर ठाकरे म्हणाले की, आज खूप समाधान वाटले.
यावेळी मिलिंद नार्वेकर, विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी, माजी सभापती सुनीता गडाख, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, संजय शेंडगे, संभाजी कदम, अशोक गायकवाड, दत्ता जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या जयघोष करून परिसर दणाणून टाकला होता.