नगर – महापालिका आयुक्त व पोलिसांबद्दल शिवराळ आणि अरेरावीची भाषा वापरणारे भाजपचे आ. नितेश राणे यांना जिल्हाबंदी करावी व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन चळवळीतील सर्व संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी येत्या मंगळवारी दि. 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.
रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्यासह अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, बंडू आव्हाड, किरण दाभाडे, सचिन शेलार, नितीन कसबेकर, समीर भिंगारदिवे, संतोष शिरसाठ, योगेश साठे, हरिष आल्हाट आदींसह अन्य नेत्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत आ. राणे यांनी नुकत्याच केलेल्या नगर दौऱ्यातील वक्तव्याचा निषेध केला. नगर शहरात त्यांनी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मनपा आयुक्त व पोलिसांबद्दल अनुचित भाष्य केले आहे. त्यामुळे आम्ही सर्व पोलीस व आयुक्तांच्या पाठीशी असून,आ. राणेंवर कायदेशीर कारवाई करावी तसेच जातीय व धार्मिक तेढ वाढवणारे राजकीय नेते-पुढाऱ्यांना शहर बंदी करावी आणि आयुक्त व पोलिसांना शिवीगाळ केल्याने आ. राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागण्यांसाठी 25 रोजी सकाळी 11 वाजता तारकपूर रस्त्यावरील बिशप हाऊसपासून पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.