पिंपरी – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे रविवारी (दि.6) उद्घाटन होत असतानाच राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्तेआपसात भिडल्याचे चित्र शाहूनगरमध्ये पहायला मिळाले. एकमेकांच्या पक्षविरोधी घोषणा देत असतानाच संयम सुटल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हे कार्यकर्ते एकमेकांकापासुन दूर झाले. मात्र तरीदेखील या परिसरात तणावाचे वातावरण होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शाहूनगर येथे विकसित केलेल्या अटलबिहारी वाजपेयी उद्यानाचे दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र, दुपारी चार वाजता याठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने भाजपच्या निषेधार्थ आंदोलन सुरु करण्यात आले. त्याचवेळी भाजप कार्यकर्तेदेखील याठिकाणी पोचले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षाविरोधात घोषणा देत होते. मात्र, यावेळी संयम सुटल्याने दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकमेकांना भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत, कार्यकर्त्यांना दुर केले.
दरम्यान, केएसबी चौकात आण्णासाहेब पाटील स्मारकाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. तत्पुर्वी कॉंग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी याठिकाणी बसकन मारत भाजपविरोधी घोषणाबाजी केली.