बीजिंग : जागतिक बॅडमिंटन क्षेत्रात बॅडबॉय या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला चीनचा ऑलिम्पिकपदक विजेता खेळाडू लिन डॅन याने निवृत्ती जाहीर केली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही, असे त्याने पूर्वीच जाहीर केले होते. एकेरी गटात 2008 व 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत डॅनने विजेतेपद पटकावले होते. तसेच त्यानंतर झालेल्या जागतिक स्पर्धेतही त्याने सरस कामगिरी करताना 5 सुवर्णपदके मिळवली होती.
आता 37 वर्षे वय आहे, त्यामुळे इथेच थांबलेले चांगले. आजवर ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचे आभार मानतो. गेल्या मोसमापासून सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे योग्य वेळी निवृत्तीचा निर्णय घेतला, असे डॅनने माध्यमांशी बोलताना सांगितले.
आक्रमकवृत्ती, धडाकेबाज खेळ आणि टीकेला त्याच भाषेत उत्तर देण्याच्या स्वभावाने त्याला बॅडबॉय असे संबोधले जात होते. संपूर्ण कारकिर्दीत डॅनने 666 एकेरीचे सामने जिंकले आहेत.